🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 8
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय पक्ष म्हणून असणारी मान्यता धोक्यात आली आहे का ? मनसेने त्यांच्या नेहमीच्या खळ्ळखट्याक शैलीने बँकेत मराठीत व्यवहार करा म्हणून आंदोलन सुरू केले. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांनी डोळ्यांवर कातडे ओढून घेतले. सगळे व्यवस्थित सुरू असताना राज ठाकरे यांनी तडकाफडकी आंदोलन का मागे घेतले हा प्रश्न सगळेच विचारत होते, त्यामागील कारण उघड होते आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरुद्ध कथित द्वेषपूर्ण भाषण, लक्ष्यित हिंसाचार आणि धमक्यांसंबंधी अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची मागणी करणारी याचिका मनसेविरोधात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत राज ठाकरे यांच्यावर हिंदी भाषिकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणे दिल्याचा आरोप आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयासमोर पुरेसे पुरावे सादर झाले तर राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता खरच रद्द होऊ शकते. त्यामुळे आता न्यायालयीन लढाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारतातील प्रत्येक तरुणाने आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व म्हणजे अनंत अंबानी हे आहेत. स्टँड अप कॉमेडी करणार्या हिंदू धर्म,संस्कृती,परंपरा यांचा द्वेष करणार्या मनोविकृत कलाकारांच्या कार्यक्रमाला जाणार्या आजच्या तरुणाईने मूर्तीमंत आदर्श काय असतो हे बघायचे असेल तर अनंत अंबानी यांच्याकडे पाहिले पाहिजे. भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबाचे सदस्य असणार्या अनंत अंबानी यांनी आज रामनवमीच्या दिवशी जामनगर ते द्वारका येथील द्वारकाधीश मंदिर अशी तब्बल १८० किमी लांबीची पदयात्रा पूर्ण केली. या आध्यात्मिक प्रवासात त्यांच्यासोबत आई नीता अंबानी आणि पत्नी राधिका देखील होत्या.ही पदयात्रा करत असताना ते दररोज ६ ते ७ तास म्हणजे जवळपास रोज २० किमी अंतर चालत होते. या काळात ते सतत हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करताना दिसले. अनंत अंबानी हे गेल्या बऱ्याच काळापासून कुशिंग सिंड्रोम नावाच्या एका दुर्मीळ हार्मोनल आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना दमा आणि लठ्ठपणासारख्या गंभीर दीर्घकालीन समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र तरी देखील आपल्या आजारावर मात करत ही कठीण वाटणारी पदयात्रा त्यांनी पूर्ण केली. एक श्रीमंत तरुण जो दुर्धर आजाराने ग्रस्त आहे , ज्याला आपल्या श्रद्धेचे पालन करताना लाज वाटत नाही तर अभिमान वाटतो हे खरोखरच आत्मसात करण्याजोगे गुण आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
दीनानाथ मंगेशकर दवाखान्याचे संचालक डॉक्टर केळकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली. मधल्या काळातील दुर्दैवी घटनाक्रम आणि त्यावर सरकारने नेमलेली समिती या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची पत्रकार परिषद महत्वाची होती. त्यांनी डॉक्टर घैसास यांची चूक आणि त्यामुळे घडलेला घटनाक्रम सांगितला. त्याच प्रमाणे त्यांनी भविष्यात आम्ही काय काळजी घेणार आहोत याची सुद्धा माहिती दिली. परंतु या पत्रकार परिषदेतील पत्रकारांची संवाद साधण्याची पद्धत , भाषा आणि एकंदरच वर्तन हे अत्यंत आक्षेपार्ह होते. अश्या पद्धतीची पत्रकारांनी उर्मट वागून वक्त्याला अवमानित करणारी एकही पत्रकार परिषद आजवरच्या पहाण्यात आलेली नाही. दूसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पत्रकार परिषदेत मीडिया ट्रायल घेण्याचा हिडीस प्रयास सुद्धा इथे दिसून आला त्याचा सुद्धा तीव्र निषेध केला पाहिजे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पत्रकार ज्या आक्रमक पद्धतीने प्रश्न विचारत होते ते बघता अजून काही काळ पत्रकार परिषद चालली असती तर कदाचित डॉक्टर केळकर यांच्यावर पत्रकारांनी हल्लाच केला असता का ? असे वाटण्याजोगी परिस्थिति होती. महाराष्ट्रातील पत्रकारिता सभ्यता , माणुसकी या परंपरा विसरून पिसाळलेल्या कुत्र्यांची झुंड झाली आहे. कितीही कटू वाटले तरी हे सत्य आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
एखाद्या देशाने कुणाचे ऐकून वार्यावरची वरात काढली तर त्याची कशी दुरवस्था याचे उत्तम उदाहरण म्हणजे बांगलादेश आहे. शेख हसिना यांची राजवट उत्तम सुरू होती. महत्वाचे म्हणजे मूलतत्ववादी नियंत्रणात होते आणि अल्पसंख्यांक हिंदू पण सुखात जगू शकत होते. परंतु जो बायडनच्या नादाला लागून त्यांचे लष्कर प्रमुख आणि जमात ए इस्लामी यांनी शेख हसिना यांची राजवट उलथली. मोहमद युनूस या कठपुतळीच्या हातात सत्ता आली. जमात ए इस्लामीने हिंदूंचे लचके तोडायला सुरुवात केली आणि लष्कराने डोळ्यावर कातडे ओढून घेतले. मोहम्मद युनूस आणि विद्यार्थी नेत्यांनी भारतावर अश्या भाषेत टीका केली की परतीचे सगळे दोर कापले गेले. पाकिस्तानी आय एस आय ला पायघड्या टाकून बोलावले. परंतु अमेरिकेत सत्तांतर झाले. ट्रंप यांनी बांगलादेश प्रकरण मोदींच्या गळ्यात टाकून दिले. निराधार युनूस चीनला शरण गेला परंतु सध्या चीनलाच भारताची मदत हवी आहे त्यामुळे चीनने पण हाकलून दिले. बांगलादेश मधील युनूस सरकारला आता हाती रुमाल बांधून आणि दाती तृण धरून भारताला शरण येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
डोनाल्ड ट्रंप या व्यक्तीबद्दल जगाला त्याने जगभरातील सगळ्याच देशांशी वाकडे घेण्यास प्रारंभ केला आणि त्याने संपूर्ण जगावर अघोषित असे आर्थिक महायुद्ध लादले आहे. ज्यावेळी असे महायुद्ध सुरू होते सगळेच जण आपापले मित्र राष्ट्र हुडकून एकत्रितपणे या समस्येचा सामना करण्याचा विचार करू लागतात. भारत आणि चीन हाडवैरी आहेत. भारताला खड्ड्यात घालण्याचे सातत्याने स्वप्न बघणारा चीन ट्रंप यांच्या लहरी वागणुकीचा फटका बसल्यावर शहाणा झाला आणि चक्क भारताशी भारत सांगेल त्या अटींवर चर्चा करायला तयार झाला आहे. ही भारतासाठी सुखद वार्ता आहे कारण चीनशी संघर्ष करण्यास मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सज्ज होत असला तरी कोणतेही युद्ध हे खर्चिक असते त्यामुळे ते टळणे कधीही इष्ट.
🔽
#mnsadhikrut #RajThackeray #anantambani #dinanathmangeshkarhospital #doctorkelkar #Bangladesh #SheikhHasina #DevendraFadnavis #abhijeetrane #politics





Comments